नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅासस हेरगिरी प्रकरणी ३ सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही रविंद्रन हे या समितीचे अध्यक्ष असतील. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही, रामण्णा, न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहल यांच्या पीठानं हा आदेश दिला. या चौकशी समितीच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालय स्वतः देखरेख ठेवणार आहे. याप्रकरणी केंद्र सरकारनं कसलाही नकार दर्शवलेला नाही, याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांच्या खाजगीपणाचं रक्षणही तितकच महत्त्वाचं आहे, खाजगीपणाच्या अधिकारावर काही नर्बंध असले तरी, त्यांना घटनात्मक संरक्षणही आहे. फक्त राष्ट्रीय सुरक्षेसाठी, दहशतवादी कारवाया रोखण्याकरता खाजगीपणावर निर्बंध घातले जाऊ शकतात, असं न्यायालयानं सांगितलं.