नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळातली भारत-आसियान मैत्री उभयपक्षी संबंध भविष्यातही मजबूत राखेल आणि लोकांमध्ये परस्पर सद्भावनेचा पाया तयार करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज १८ व्या आसियान-भारत शिखर परिषदेला व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. कोविड १९ मुळे सर्वांनाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. हा आव्हानात्मक काळसुद्धा भारत-आसियान मैत्रीची कसोटी पाहणारा ठरला, असं ते म्हणाले. आसियानची एकता आणि केंद्रीयता हा भारतासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचा विषय राहिला आहे. पुढच्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाच भारत-आसियान भागिदारीला ३० वर्ष पूर्ण होत आहेत. हा मैलाचा दगड असून, भारत पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्रीवर्ष म्हणून साजरं करेल, अशी घोषणा मोदी यांनी केली. कोविडोत्तर आर्थिक सुधारणेसह महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर या परिषदेत चर्चा होणार आहे.