मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरण करून न घेतलेल्या किंवा केवळ एकच मात्रा घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा लोकांसाठी “हर घर दस्तक” हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानी दिले आहेत. अकोल्यात लस नं घेणाऱ्यांशी थेट संपर्क साधून त्यांना लसीकरण केंद्रावर येण्याचं आवाहन केलं जात आहे. पहिल्या टप्प्यात हा प्रयोग केवळ ग्रामीण भागात राबविण्यात येणार असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यामध्ये लसीकरणासाठी क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात येणार असून दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे.नंदुरबारमध्ये लसीकरण न झालेले, एक मात्रा घेतलेले, स्थलांतरित, अश्या वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी प्रत्येक गावात, बँक, आठवडे बाजार, महाविद्यालय तसेच तपासणी नाक्यांच्या ठिकाणी लसीकरणासाठी शिबिरं केली जाणार आहेत. नर्मदा नदीच्या  काठावरच्या गावातल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी बोट ॲब्युलन्सच्या मदतीनं लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.