नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ करणार आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे रिझर्व्ह बँकेची थेट किरकोळ सेवा योजना. या योजनेअंतर्गत किरकोळ गुंतवणुकदारांना केंद्र आणि राज्य सरकारांनी वितरीत केलेल्या रोख्यांमध्ये थेट गुंतवणूक करायची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याकरता त्यांना रिझर्व्ह बँकेत आपल्या सरकारी रोख्यांदर्भातलं ऑनलाईन खातं विनाशुल्क तयार करता येणार आहे. एकात्मिक अंतर्गत देखरेख योजना हा बँकेचा दुसरा उपक्रम आहे. या योजनेअतंर्गत संपूर्ण देशभरातल्या ग्राहकांच्या तक्रारी आणि दावे एकाच केंद्रीकृत पद्धतीनं सोडवले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.