मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकांसाठी आज मतदान होत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६ ठिकाणी ८ मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. बँकेच्या १७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणूकीत सर्वसमावेशक शेतकरी विकास पॅनल आणि इतर विरोधकांमध्ये थेट लढत होणार आहे. जळगाव मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी सकाळी ८ वाजता मतदान सुरु झालं. निवडणुकीतल्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध निवड झाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठीही आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. एकूण १२ केंद्रांवर मतदान सुरु आहे. बँकेच्या १८ जांगासाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी भाजपा प्रणीत शेतकरी विकास पॅनेलनं १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर दोन जागांवर अपक्ष मैदानात आहेत.