मुंबई : “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या दूरदृष्टीच्या, अलौकिक नेतृत्वाला विनम्र अभिवादन. आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्वानं आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा पाया रचला. पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नेतृत्वाची सक्षम फळी निर्माण केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला शाश्वत विकासाची दिशा दाखवली. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना उदारमतवादाचे संस्कार दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रगत, पुरोगामी विचारातूनच आजचा संपन्न, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्र घडला आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर पुढं घेऊन जाणं, हीच स्वर्गीय चव्हाण साहेबांना खरी आदरांजली ठरेल”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय चव्हाण साहेब हे राज्याला व देशाला लाभलेले द्रष्टे, कर्तृत्ववान नेते होते. ते कृतिशील विचारवंत, उत्तम संसदपटू होते. कुशल प्रशासक, सिद्धहस्त लेखक, कलारसिक होते. राजकीय, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समतोल विचारांची, वैचारिक आदानप्रदानाची, उदारमतवादाची संस्कृती रुजवण्याचं काम त्यांनी केलं. राज्याचा पायाभूत विकास करताना सांस्कृतिक विकासावर भर दिला. संरक्षणमंत्री म्हणून देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर वाटचाल करीत त्यांच्या स्वप्नातील समृद्ध, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढसंकल्प करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.