नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं आपल्या स्थापनेपासून म्हणजे १९७८ पासून आजतागायत १० हजार जणांचे प्राण वाचवले आहेत, असं भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यांनी सांगितलं. राष्ट्रीय मेरीटाईम शोध आणि बचाव संस्थेच्या बैठकीत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. या बैठकीत सागरी सुरक्षेसंबंधी विविध पैलूंवर तसंच शोध आणि बचावकार्याविषयी अभिनव तंत्रज्ञान या मुद्द्यांवर चर्चा झाली. सागरी क्षेत्रात शाश्वत सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यावरही या बैठकीत विचारविनिमय झाला.भारतीय तटरक्षक दलानं चेन्नई, मुंबई आणि अंदमान निकोबार बेटांवर तीन सागरी बचाव समन्वय केंद्रं स्थापन केली आहेत.