नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.
दूरदर्शनने 60 वर्षांच्या आपल्या प्रवासात दिलेले योगदान जावडेकर यांनी यावेळी अधोरेखित केले. दूरदर्शनच्या जुन्या कार्यक्रमांबद्दलच्या आठवणींना उजाळा देऊन दूरदर्शनचे कार्यक्रम दशकानुदशके लोकांवर कसे आकर्षित करत आले आहेत, हे त्यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन दूरदर्शनने अवलंबलेल्या अत्याधुनिक तांत्रिक बदलांबाबत त्यांनी सांगितले. मोबाइल ॲपमुळे दूरदर्शन प्रत्येकाच्या हातात उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले. डी फ्री डिशच्या विस्ताराबाबत जावडेकर यांनी माहिती दिली.
विश्वासार्हता हा दूरदर्शनचा युएसपी असून डी डी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल, असे जावडेकर यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दूरदर्शन आणि डी डी न्यूज काळानुरुप प्रगत झाले आहेत, असे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी सांगितले. आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात दूरदर्शनने आपल्या प्रेक्षकांसाठी अचूक आणि अद्ययावत बातम्यांची परंपरा कायम ठेवली आहे, त्यांनी सांगितले.
दूरदर्शन, तरुण प्रेक्षकांसोबत जोडले गेल्यामुळे अधिकाअधिक तरुण होत असल्याचे प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशि शेखर वेम्पती यांनी सांगितले.
टपाल तिकिटाचे अनावरण आणि अमिताभ बच्चन यांनी अभिवाचन केलेली कविता प्रकाशित
दूरदर्शनच्या 60 व्या स्थापना दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण यावेळी प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले.
आलोक श्रीवास्तव लिखित या कवितेचे अभिवाचन अमिताभ बच्चन यांनी केले आहे. बच्चन यांनी वैयक्तिक मानवंदना म्हणून दूरदर्शनला ही कविता समर्पित केली आहे.
दूरदर्शनचा 60 वर्षांचा प्रवास, दूरदर्शन कसे नवभारताचे प्रतीक झाले आहे, हे या कवितेत सादर करण्यात आले आहे.
डीडी इंडिया आता कोरियात उपलब्ध
केबीएस वर्ल्ड, या कोरियाच्या सरकारी प्रसारण वाहिनीचा डी डी फ्री डिशवर प्रारंभ आणि केबीएस वर्ल्डच्या माय K OTI मंचावर डीडी इंडियाचा प्रारंभ जावडेकर यांनी केला. यावेळी कोरियाचे राजदूत शिन बॉन्गकिल उपस्थित होते.
दूरदर्शनचा 60 वर्षांचा प्रवास
15 सप्टेंबर 1959 मध्ये दूरदर्शनची सेवा सुरु झाली. दूरदर्शन, आज जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था असून राष्ट्र उभारणीत तिची मोठी मोलाची भूमिका आहे.
बातम्यांची विश्वासार्हता, सर्वांसाठी मनोरंजन यात दूरदर्शनची बरोबरी कोणी करु शकणार नाही.