मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये  तब्बल दोन वर्षांनंतर आज  पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करून सुरु झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६३५ शाळा आजपासून सुरू होत असून संपूर्ण शाळांचं निर्जंतुकीकरण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या १ हजार ७३६ शाळांमध्ये अंदाजे १ लाख २९ हजार ६३५ विद्यार्थी आज पासुन शाळेत उपस्थित राहणार आहेत. पालकांच्या सहमतीनं  विद्यार्थी शाळेत दाखल होत असुन मुखपट्टी घातलेले विद्यार्थी वर्गात दिसुन येत आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरु झाल्या असल्यातरी ग्रामीण भागात मात्र सकाळी अकरा पासून शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु झाल्यानं विद्यार्थी आणि  पालकांमध्ये आनंदाचं  वातावरण दिसत आहे. बीड जिल्ह्यात आज सकाळी जिल्हा परिषद तसंच  खाजगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या , सकाळीच शाळेत आलेल्या  विद्यार्थांचं  गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं . खूप दिवसांनी आपले  वर्ग मित्र भेटल्यामुळे विद्यार्थी आनंदी होते. शासन निर्देशा प्रमाणे सर्वत्र कोविड १९ ची नियमावली पाळण्यात येत असून  शिक्षण विभागाच्या वतीनं यावर नियंत्रण ठेवलं जात आहे. वाशीम जिल्ह्यातल्या ३५० शाळांमध्ये  इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आज पासून सुरू झाले. शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत केलं. नव्यानं येऊ घातलेल्या साथ रोगाचा धोका टाळून शाळा कायमस्वरूपी सुरू राहावी अशी अपेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक व्यक्त करत आहेत. अमरावती जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर आजपासून सुरु झाले. आज पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात इयत्ता पहिली ते सातवीच्या ३१९ शाळा असून ६९ हजार १८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमध्ये  इयत्ता पहिली ते सातवीत २ लाख ९९ हजार ४६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग आज सुरु झाले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला.  गडचिरोली जिल्ह्यात आज पहिली ते सातवीचे वर्ग सुरु झाले. शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी गडचिरोली इथल्या स्कुल ऑफ स्कॉलर्स मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तसंच कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनाबाबत पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरु झाले. जिल्ह्यात खोडसगाव इथल्या शाळेच्या प्रशासनानं  सजवलेल्या  बैलगाडीमधून  विद्यार्थ्यांना शाळेत आणलं. धुळे जिल्ह्याच्या शहरी भागात  आज पहिली ते चौथीचे वर्ग सुरु झाले. राज्य सरकारनं प्राथमिक शाळा आजपासून  सुरू करायला परवानगी दिली असली तरी ओ मायक्रॉन विषाणू संसर्गाची भिती, तयारीचा अभाव या कारणामुळे अनेक प्रमुख शहरांमध्ये पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्र, ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात १५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबादमध्ये ५ डिसेंबरनंतर तर नाशिक आणि नागपूरमध्ये १० डिसेंबरनंतर या शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं  घेतला जाणार आहे.