नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना आखल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत सांगितले. विविध शेतमालासाठी सरकार किमान आधारभूत किमंत जाहीर करत असून, गेल्या २०२०-२१ च्या खरीप हंगामात सरकारनं आधारभूत किमतीने ८९४ लाख टनाहून अधिक धानखरेदी केली. याचा लाभ १३१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला. २०२१-२२च्या रब्बी हंगामात ४३३ लाख टनाहून अधिक गहू खरेदी झाली असून त्याचा लाभ ४९ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला. सरकारनं ८ लाख ३७ हजार टन डाळी आणि तेलबियांची खरेदी केली असून त्यामुळे ५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला, अशी माहिती तोमर यांनी लेखी उत्तरात दिली.