मुंबई : राज्य सेवा परीक्षा-2017 आणि 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

राज्य सेवा परीक्षा-2017 आणि राज्य सेवा परीक्षा 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज शासनाने माहिती दिली की, राज्य सेवा परीक्षा-2017 च्या निकालाच्या अनुषंगाने  श्रीमती शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका क्रमांक 6578/2018 केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाने  दि. 8 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम आदेश दिले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा, 2017 साठी शिफारस करण्यात आलेल्या 377 उमेदवारांची सुधारित यादी 9 सप्टेंबर 2019 रोजी शासनास प्राप्त झाली. हे 377 उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा, 2018 अन्वये  शिफारसप्राप्त 129 असे एकूण 506 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार या सर्व उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत रुजू होण्याचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे.