मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून एकूण ५६० मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे रविंद्र भोयर आणि अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांच्यात लढत आहे. अकोला-बुलढाणा-वाशिममध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. सेनेकडून गोपीकिशन बजोरिया आणि भाजपकडून वसंत खंडेलवाल रिंगणात आहेत. यानिवडणुकीसाठी बुधवारीच व्हिप जारी करण्यात आला आहे. महापालिका आणि नगर परिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या गटनेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगातर्फे संबंधित संघाचा आढावा घेतला जात आहे. मतदारसंघात निरीक्षक म्हणून दिलीप पांढरपट्टे दाखल झाले असून ते जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवत असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. १४ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.