मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानं एसटी महामंडळानं ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती परिवहनमंत्री अॅड.अनिल परब यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणं शक्य नसल्यानं, तसंच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यानं, या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यां पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जाते.