पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील वास्तव्यास असलेल्या कोरोनाबाधित व कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांना निवासी मिळकत कर माफ करण्यात यावा. याबाबत भारतीय जन संसद पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय जाधव, उपाध्यक्ष विजय शहापुरकर व पिंपरी चिंचवड कार्यकारिणी यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिनांक ०८/०९/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते.

भारतीय जन संसद पिंपरी चिंचवड कार्यकारिणीच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. स्थायी समितीच्या बुधवारी (०८/१२/२०२१) झालेल्या बैठकीत कोरोनामुळे मयत झालेल्या मिळकत धारकांना सामान्य कर रकमेत १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य करणाऱ्या निवासी मिळकतधारकाचा कोरोनामुळे वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये मृत्यू झालेला असल्यास, त्याच्या कुटुंबाला दिलासा देणेकामी २०२२-२३ या सरकारी वर्षाकरीता कराचे व करदोत्तर बाबीचे दर निश्चित करताना, अशा मिळकत धारकांना सामान्य कर रकमेत १०० टक्के सूट, तसेच मिळकत कर हस्तांतरण नोंद नोटीस फी माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याकरीता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून सदर विषय महानगरपालिका सभेकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.