मुंबई : पर्यटकांना एमटीडीसीमार्फत लोकप्रिय पर्यटनस्थळांची माहिती व नाविण्यपूर्ण अनुभव, उपक्रमांची माहिती तसेच सवलती संदर्भात माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आलेल्या दालनास राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील लोकप्रिय ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासांची माहिती ज्यामध्ये महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, वने, साहसी पर्यटन, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे, जल पर्यटन आदींचा समावेश आहे.
जागतिक दर्जाच्या सुविधा, अनुभवी प्रशिक्षक व अत्याधुनिक उपकरणांसह पर्यटनमुग्ध करणारे अनुभव एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटकांनी घ्यावे, असे आवाहनही राज्यमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थायकीय संचालक जयश्री भोज यावेळी उपस्थित होत्या.
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले आहे. एमटीडीसीमार्फत पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी मंत्रालय येथील त्रिमूर्ती प्रांगणात माहिती व आरक्षण केंद्र दि. 22 ते 24 डिसेंबर या कालावधीसाठी उभारण्यात आले आहे.
एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय (NRI) सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबत तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या 29 पर्यटक निवासे, 30 उपाहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधीही मंत्रालयात उभारलेल्या या केंद्रामध्ये माहिती देण्यात येत आहे. सोबतच महामंडळाच्या जलपर्यटनामार्फत कार्यान्वित केलेल्या नाशिक बोटक्लब, गणपतीपुळे बोटक्लब व तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ऍक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) या संस्थेबाबत माहिती देण्यात येत आहे.