मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे. मुंबईत काल ८ हजार ६३ नवे रुग्ण आढळले. या पैकी केवळ ५०३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं असून त्यापैकी ५६ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली. मुंबईत काल एकाही रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाला नाही. राज्यात काल २ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ९९ हजार ८६८ जणांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख १२ हजार ६१० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४१ हजार ५४२ रुग्ण दगावले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर घसरुन ९७ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर आला आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ५० रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३६ जण पुणे महानगरपालिका, तर ८ जण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातले आहेत. पुणे ग्रामीण आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर, ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.