नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काल निर्माण झालेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी आज दुपारी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना कालच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. उपराष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांशी आज चर्चा करुन काल झालेल्या घटनाक्रमांची माहिती घेतली. भविष्यात अशाप्रकारची चूक होऊ नये यासाठी कठोर पावलं उचलली जावी, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कालच्या फिरोजपूर भेटीदरम्यान आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने आज दोन सदस्यांच्या एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंग गिल तसंच गृह आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव अनुराग वर्मा यांचा या समितीत समावेश आहे. समिती येत्या तीन दिवसांत अहवाल सादर करेल, अशी माहिती सरकारनं दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. या सुरक्षा त्रुटीसाठी कोण कारणीभूत आहे हे बघून दोषींवर पंजाब सरकारनं कडक कारवाई करावी असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेबद्दल असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल म्हटलं आहे.