मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून त्यानंतर कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सध्या २५ हजार रुग्णांसाठी खाटांची तयारी केली आहे. १० टक्के रुग्णांना दाखल करावे लागले तरीही ३५ हजार खाटांची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यानं  दिली. दरम्यान, बेस्टच्या विविध आगारातील ६६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची  लागण झाली आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. यातील १० जणांना घरी सोडलं आहे तर उर्वरित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली.