नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड योद्ध्यांना अधिक संरक्षण देणारी लशीची प्रतिबंधात्मक मात्रा द्यायला आज पासून सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचते कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचा समावेश आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही आजपासून प्रतिबंधात्मक मात्र देण्याची सुरुवात झाली. आतापर्यंत सुमारे १ लाख ५९ हजार जणांनी ही प्रतिबंधात्मक मात्रा घेतली आहे. या मात्रेसाठी वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिशानिर्देशात स्पष्ट केलं आहे. पात्र लाभार्थ्यांना कोविन मंचावरुन आठवण करुन देणारे एसेमेस जातील. भेटीची वेळ ऑनलाईन निश्चित करुन अथवा थेट लसकेंद्रावर जाऊन लस घेता येईल. ज्या लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे उलटले असतील त्यांना प्राधान्याने लस देण्यात येईल. आधी लसीकरण मोहिमेअंतर्गत घेतलेल्या लशीचीच वर्धक मात्रा घ्यायची आहे.