मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला परवानगी दिल्याचं मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कोरोना प्रादुर्भाव आणि इतर बाबी तपासून शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचा निर्णय आजच्या विभागाच्या बैठकीत झाल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान, राज्यातली महाविद्यालयं चालू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.