नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्वात जुनी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी आजपासून पुन्हा एकदा टाटा समुहाकडे गेली आहे. एअर इंडियाच्या १०० टक्के मालकीच्या हस्तांतरणाची प्रक्रीया आज पूर्ण झाली आणि टाटा सन्सच्या मालकीच्या तलेस या उपकंपनीकडे एअर इंडिया हस्तांतरित करण्यात आली. आता एअर इंडियाचं पूर्ण व्यवस्थापन टाटा समुहाकडे आलं असून टाटा सन्सनं नियुक्त केलेल्या नव्या संचालक मंडळानं आज पासून एअर इंडियाचा कारभार हाती घेतला. त्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

एअर इंडियाच्या खरेदीची बोली टाटा सन्सनं ऑक्टोबरमध्ये जिंकली होती. टाटा सन्सच्या मालकीची उपकंपनी असलेल्या टेलेस प्रायव्हेट लिमिटेडनं सर्वाधिक १८ हजार कोटींची बोली लावली होती. या बोलीमध्ये एअर इंडिया वरचं १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी टाटा सन्सनं घेतली असून उर्वरित २ हजार ७०० कोटी रुपये सरकारला देण्यात आले आहेत. या व्यवहारामुळं एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची १०० टक्के मालकी, तसंच विमानतळावरचं व्यवहार हाताळणाऱ्या एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडची ५० टक्के मालकी टाटा समुहाकडे आली आहे. एयर इंडिया ब्रँड अंतर्गत ८ लोगो आहेत. हे लोगोही टाटांच्या मालकीचे झाले आहेत आणि ५ वर्षांपर्यंत ते इतर कोणाकडेही हस्तांतरित करता येणार नाहीत. त्यानंतर केवळ भारतीय व्यक्तीकडेच त्यांची मालकी सोपवता येईल, असंही सरकारनं स्पष्ट केलंय.

पहिल्या वर्षी टाटा सन्सला एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर ठेवावं लागेल. दुसऱ्या वर्षी कोणाला कमी करायचं झालं तर स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी लागेल. या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी आणि प्रॉव्हिडंट फंडचे लाभ दिले जातील, तसंच निवृत्तीनंतर सरकारकडून वैद्यकीय लाभ दिले जातील.
या व्यवहाराबद्दल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या व्यवहारासाठी टाटा समुहाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि टाटांच्या नेतृत्त्वाखाली एअर इंडियाला पुन्हा बहार येईल, असं म्हटलं आहे.

टाटा समुहात एअर इंडियाला पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी टाटा समुह उत्साही असून तिला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनविण्यासाठी कटीबद्ध आहे. एअर इंडिया सर्व कर्मचाऱ्यांचेही आम्ही स्वागत करतो असं टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी या व्यवहाराबद्दल सरकार आणि त्यातल्या सर्व विभागांचे आभार मानले आहेत.

जेआरडी टाटा यांनी स्थापन केलेल्या एअर इंडियानं पहिलं उड्डाण १५ ऑक्टोबर १९३२ रोजी केलं होतं. १९५३ मध्ये एअर इंडियाचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं. आता ६९ वर्षांनंतर कंपनी पुन्हा टाटांच्या मालकीची झाली आहे.