मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज साताऱ्यात बातमीदारांशी बोलत होते. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड१९ प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील अशा विद्यार्थ्यांना वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही अशांना ऑनलाईन पद्धतीनं शिकवलं जाईल असं सामंत यांनी सांगितलं.
स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून तिथल्या प्रशासनानं महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांचं लसीकरण वेगानं व्हावं याकरता स्थानिक पातळीवर, लसीकरण शिबीरांचं आयोजन करायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असं सामंत यांनी सांगितलं.
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार असल्याचं ते म्हणाले. १५ फेब्रुवारी नंतर राज्यातल्या कोरोनाचा परिस्थितीचा आढावा घेवून, कुलगुरूंशी चर्चा केली जाईल आणि परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.