नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशमधल्या ४४ हजार ६०५ कोटी रुपये खर्चाच्या केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे ९ लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी जमिनीच्या सिंचनाकरता आणि ६२ लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, तसंच १०३ मेगावॅट जलविद्युत आणि २७ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. दमणगंगा-पिंजल, पार-तापी नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार आणि पेन्नार-कावेरी या पाच नद्या जोड प्रकल्पांचा अहवाल देखील अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पांच्या लाभार्थी राज्यांकडून सहमती मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रसरकार साहाय्य करेल असं त्या म्हणाल्या. आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य यंत्रणेकरता व्यासपीठ उपलब्ध होणार असून यामध्ये आरोग्य सेवा पुरवठादार, आरोग्य सुविधा, आणि अन्य सेवांची डिजिटल नोंदणी करता येईल असं त्या म्हणाल्या.

कोविड महामारीमुळे सर्व वयोगटांमध्ये मानसिक आरोग्याबाबतच्या समस्या वाढल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेता राष्ट्रीय टेली मेडिसिन आरोग्य कार्यक्रम सुरु करण्यात येईल. या माध्यमातून चांगल्या दर्जाची समुपदेशन सेवा उपलब्ध होईल असं त्या म्हणाल्या. या प्रकल्पाअंतर्गत देशातल्या मानसिक आरोग्य सेवा देणाऱ्या २३ दर्जेदार संस्थांचा समावेश असून बंगळुरू इथली NIMHANS ही संस्था त्यांचं नेतृत्व करेल असं त्या म्हणाल्या. हर घर नल से जल योजनेअंतर्गत आगामी आर्थिक वर्षात ३ कोटी ८० लाख घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात आगामी वर्षात ८० लाख घराचं काम पूर्ण केलं जाईल. तुरळक लोकवस्ती मर्यादित दळणवळण, आणि कमी पायाभूत सुविधा असलेल्या सीमावर्ती गावांसाठी वायबरन्ट विलेजेस हा नवा कार्यक्रम सुरु केला जाईल.