मुंबई : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेकरीता तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमधून अनुदानाकरीता पात्र संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आयटीआय व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळांनी १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी या योजनेमधून अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांनी ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन परिपत्रकानुसार २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव पाठविण्याबाबची कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.