नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा काल त्यांच्यावर दाखल झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या नवी मुंबई विभागाने ही फिर्याद दाखल केली आहे. नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेलसाठी वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ते सज्ञान असल्याचे म्हटले होते. त्या जागेमध्ये कोणताही व्यवसाय केला नसल्यामुळे आयकर आणि विक्रीकर विवरणपत्र सादर केले नसल्याचेही म्हटले होते. ते सज्ञान असल्याबाबतची चुकीची माहिती दिली होती. त्यांनी २१ ऑगस्ट १९९७ रोजीच्या एक हजार रुपये दराच्या प्रतिज्ञापत्रवर झहिदा वानखेडे यांच्यासमवेत केलेल्या भागीदारीपत्राची प्रत दिली होती. त्यामध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख नाही. त्यांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळले असून त्यामुळे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील वाशी येथील हॉटेल सद्गुरु या हॉटेलच्या अनुज्ञप्तीचे व्यवहार २ फेब्रुवारी २०२२ रोजी कायमस्वरुपी रद्द केले.
खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्यानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने १९ फेब्रुवारी २०२२ रोजी वानखेडे यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले यांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.