नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात. अंतरामुळे समस्या मर्यादित क्षेत्रालाच भेडसावतील अशी आता स्थिती नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

पॅरिसमधील हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रातील युरोपियन महासंघाच्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते काल बोलत होते. सामूहिक प्रयत्नांमुळे महासागर शांततापूर्ण, मुक्त आणि सुरक्षित ठेवता येतात. त्यातील संसाधनांचे संरक्षण आणि ते स्वच्छ ठेवण्यास हातभार लावता येतो.

या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी योगदान देण्याच्या युरोपियन महासंघाच्या तयारीचं त्यांनी स्वागत केलं. पॅरिसमधील फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये त्यांनी भारत आणि फ्रानस यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. भारत, फ्रान्सकडे जागतिक दृष्टिकोन आणि स्वतंत्र मानसिकता असलेली एक मोठी शक्ती म्हणून पाहतो,असं त्यांनी यावेळी सांगितलं.