नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. ते आज प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची भविष्यातली वाटचाल, आणि त्याचं, केंद्रीय अर्थसंकल्पातलं प्रतिबंब या विषयावर आयोजित एका वेबिनारमध्ये बोलत होते. पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंच जगण्यासह, व्यवसाय करणंही सुकर होतं असं ते म्हणाले. आपल्या नेतृत्वातलं सध्याचं सरकार पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व्यापक प्रयत्न करत आहे, आणि त्यादृष्टीनं प्रधानमंत्री गतीशक्ती योजना देशाची सध्याची सर्वात मोठी गरज आहे असल्याचं त्यांनी नमूद केलं.
सरकारनं प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे, २०१३ -२०१४मध्ये देशाचा थेट भांडवली खर्च पावणे २ लाख कोटी रुपयांचा होता, २०२२-२३ या वर्षासाठी त्यात चार पटीनं वाढ होऊन तो साडे ७ लाख कोटी रुपयांवर गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. पायाभूत सुविधांवर आधारलेल्या विकासामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल आणि सोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. नुकत्याच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून भारताच्या २१व्या शतकातल्या विकासाला दिशा दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.