मुंबई (वृत्तसंस्था) : लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी पाच कोटी रूपये करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. २०२२ – २३ च्या अर्थसंकल्पावर झालेल्या सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातली सोळा ट्क्के जनता मुंबई महानगर प्रदेशात राहते, मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असल्यानं विकासासाठी निधी वाढवून देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.  ग्रामीण भागात देखील जिल्हा नियोजनामध्ये निधी वाढवून देण्याची गरज आहे. या शिवाय चार आकांक्षीत जिल्ह्यामध्ये देखील मागास भागांचा मानव विकास निर्देशांकांच्या प्रमाणात वाढीव निधी दिला जात असल्याची माहिती त्यानी दिली.

काश्मीर फाईल्स या सिनेमाला करमुक्त करण्याबाबतचा निर्णय राज्यापेक्षा केंद्रानं घेतल्यास तो देशाला लागू होईल असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा सदस्यांकडून घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाषणांत व्यत्यय न आणण्याबाबत तालिका अध्यक्षांनी भाजपा सदस्यांना समज दिली. त्यानंतर भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.