नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलं आहे. मातृभूमी या मल्याळी दैनिकांच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्याचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. आपल्या पिढीतल्या अनेकांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घ्यायला मिळाला नाही, मात्र स्वांत्र्यांच्या अमृत काळानं आपल्याला मजबूत, विकसित आणि सर्वसमावेशक भारताची निर्मिती करायची संधी दिली आहे असं ते म्हणाले. आज जग भारताकडून मोठी अपेक्षा बाळगून असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी मातृभूमी दैनिकाच्या आजवरच्या वाटचालीचाही गौरव केला. मातृभूमीनं महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ द्यायचं काम केलं असं ते म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याविषयी अज्ञात असलेल्या गोष्टी आणि स्वातंत्र्यविरांच्या गाथा नागरिकांपर्यंत पोचवण्यात माध्यमं महत्वाची भूमिका बजावू शकतात असंही ते म्हणाले.