नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधल्या बीरभूम इथं झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. इथं मंगळवारी किमान आठ जणांचा मृत्यू झाला.
ही घटना एक घृणास्पद गुन्हा असल्याचं सांगून,मोदी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला अशा घटनांमधील गुन्हेगारांना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कधीही माफ करू नका असं आवाहन केलं. या घटनेत सहभागी असलेल्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल, अशी आशाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. केंद्राच्या वतीनं, मोदी यांनी बीरभूम हिंसाचारामागील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा करण्यासाठी राज्याला आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.
प्रधानमंत्र्यांनी काल शहीद दिनानिमित्त कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमधील बिप्लोबी भारत दीर्घिकेचं उद्घाटन केलं.अमर शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या कथांमधून प्रत्येक मूल प्रेरणा घेईल, असंही मोदी म्हणाले.