नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रायगड परिसर आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांचं जाळं मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पही येत्या एक वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चार महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण आणि १२०० कोटी रुपये खर्चाच्या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या एका प्रकल्पाची पायाभरणी, रायगड जिल्ह्यात पनवेल जवळ चिंचपाडा इथं आज त्यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांमुळे, आधुनिक रस्ते जोडणीच्या माध्यमातून रायगड जिल्हा आणि परिसरात मालाची आयात-निर्यात वाहतूक सुरळीत होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले.
कृषी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मोठं परिवर्तन होईल, तसच रायगड जिल्हा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होईल, असही त्यांनी सांगितलं. मच्छिमारांसाठी विकसित होत असलेल्या सुविधांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. कोकणातले मच्छीमार सध्या, अद्ययावत बोटी नसल्यामुळे समुद्रात फक्त दहा नॉटिकल मैलांपर्यंत मच्छीमारीसाठी जाऊ शकतात. मात्र सध्या कोची शिपयार्ड मध्ये १०० नॉटिकल मैल अंतर कापू शकणारे अद्ययावत ट्रॉलर विकसित होत असून, हे ट्रॉलर उपलब्ध झाल्यानंतर कोकणातला मच्छीमार सुद्धा समुद्रात शंभर नॉटिकल पर्यंत मजल मारू शकेल, त्यामुळे देशाच्या नील म्हणजेच जल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असही गडकरी म्हणाले.