पुणे : पुणे शहर हे नेहमीच नवनवीन बदलांसोबत राहिले असून नवीन क्रांतिकारी कल्पना, ज्ञान, वारसा, नाविन्यता, संस्कृती, चैतन्य ही येथील बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यात भरवलेली पर्यायी इंधन परिषद शाश्वत विकासाच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

येथील जे.डब्ल्यू. मेरियट हॉटेलमध्ये भरवण्यात आलेल्या जागतिक पर्यायी इंधन परिषदेच्या समारोपप्रसंगी श्री. ठाकरे बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. रंगा नाईक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे पुढे म्हणाले, या परिषदेबरोबरच भरवलेल्या प्रदर्शनामध्ये मोठ्या वाहन उद्योगांनी भाग घेतला; आणि अधिक उल्लेखनीय बाब म्हणजे ३० ते ४० वयोगटातील नवोद्योग (स्टार्टअप) स्थापन करुन वाटचाल करण्यास सुरू केलेल्या युवक-युवतींनीही भाग घेतला. इलेक्ट्रिक वाहने तसेच अन्य पर्यायी इंधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या या युवकांना आपल्या पृथ्वीची जपणूक करण्यासाठी प्रोत्साहन, सहाय्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी सुरू केलेले स्टार्टअप पुढील जवळच्या काळात मोठे नाव कमावतील, असा विश्वासही श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून गेल्या दोन वर्षात पर्यावरणाच्या अनुषंगाने चांगली धेयधोरणे बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विभाग सध्या यामध्ये महत्वा ची भूमिका बजावत आहे. देशात प्रथमच महाराष्ट्राने राज्य वातावरण बदल परिषदेची स्थापना करुन त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नागरी विकास, उद्योग, परिवहन, वने आदी क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी या परिषदेद्वारे बनवल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा निश्चितच उपयोग होईल, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कोणतेही वाहन खरेदी करताना कमीत कमी इंधनात जास्त अंतर कापणाऱ्या वाहनाला प्राधान्य देण्याची आपली मानसिकता असून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीप्रसंगी यापुढे रेंजला अधिक महत्त्व दिले जाईल. वाहन उद्योगांना या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

‘रेस टू झिरो’ या जागतिक अभियानात भाग घेत आपल्याला कार्बन न्यूट्रलतेच्या दिशेने काम करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वाहतूक क्षेत्र आणि विद्यूत क्षेत्रात विशेष काम करावे लागेल. राज्यात लाखापेक्षा अधिक लोकसंख्येची ४३ अमृत शहरे असून ६ कोटी नागरी लोकसंख्या आहे. या शहरांमध्येल हरित विकासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

पुढील काळात शाश्वत आणि पर्यावरणाची जपणूक करत विकास साधणारे हरित उद्योग जगात मोठी झेप घेणार आहेत. इलेक्ट्रिक मोबिलीटी हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्रदुषणास प्रतिबंध करणे हीच निसर्गाची योग्य पूजा ठरेल असेही श्री. ठाकरे म्हणाले.

या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेने तसेच पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेलने या परिषदेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. १० महानगरपालिकांनी स्वाक्षरी केलेल्या संयुक्त घोषणापत्रांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिचंवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह राज्यातील महानगरपालिकांचे आयुक्त, उद्योगांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.