मुंबई (वृत्तसंस्था) : खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळता यावं, यादृष्टीनं मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर अकादमीसारख्याच अकादमी भारतीय खेळांसाठीही निर्माण करायची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात आज, ‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ या पुस्तकाचं प्रकाशन आणि कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्काराचं वितरण, शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. कबड्डी महर्षी शंकरराव बुवा साळवी यांच्या सारखे मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांनी कबड्डीला मोठ्या उंचीवर नेण्यात मोलाची कामगिरी बजावली, अर्जुन तसंच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पुरुष आणि महिला खेळाडूंना त्यांनी भक्कम आधार देऊन घडवलं असं त्यांनी सांगितलं. ‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ या पुस्तकात कबड्डीमध्ये राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केलेल्या खेळाडूंचा प्रवास शब्दांकित केला आहे.