नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी संग्रहालयाचं पहीलं तिकीटही खरेदी केलं.  दिल्लीच्या तीनमूर्ती भवन इथं हे प्रधानमंत्री संग्रहालय उभारण्यात आलं आहे. राष्ट्रउभारणीत आतापर्यंतच्या सर्व प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान या संग्रहालयाच्या रुपानं करण्यात आला असून प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची ही संकल्पना आहे.  हे संग्रहालय देशाला लाभलेल्या सर्व प्रधानमंत्र्यांचे जीवन आणि देशाप्रती त्यांचं योगदान यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारत निर्माणाची कहाणी सांगेल. एकूण 43 दालनांच्या माध्यमातून 14 माजी प्रधानमंत्र्यांच्या कार्याचा प्रवास तसंच संविधान निर्माणाची गाथाही या संग्रहालयाच्या माध्यमातून उलगडण्या्त येणार आहे आहे. संग्रहालयात माहिती तंत्रज्ञानाचा अतिशय खुबीनं वापर करण्यात आला असून संवादात्मक आणि गुंतवणून ठेवणाऱ्या माहितीचा खजिनाच प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यलढ्यावर तसंच घटनेच्या रचनेवर आधारीत माहितीचे सादरीकरण सुरुवातीलाच करण्यात येतं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत देशाला कशी योग्य दिशा दाखवली आणि देशाची सर्वांगिण प्रगती साधली याबाबतचं सादरीकरण प्रेक्षकांसमोर करण्यात येतं. नव्या आणि जुन्याचा संगम असलेल्या या संग्रहालयात पुर्वीचे तीन मूर्ती भवन ब्लॉक 1 तर नव्याने बांधण्यात आलेली इमारत ब्लॉक 2 म्हणून दाखवण्यात आली आहे. या दोन्ही ब्लॉक्सचे एकत्रित क्षेत्रफळ 15,600 चौरस मीटरहून अधिक आहे. संग्रहालयाची रचना नव्या भारताच्या प्रगतीपथाचा मार्ग दाखवते. संग्रहालयासाठी प्रसारभारती, दूरदर्शन, चित्रपट विभाग, सांसद टिव्ही, संरक्षण मंत्रालय, भारतीय आणि परदेशई माध्यम संस्था आणि परदेशी वृत्त संस्था यांच्याकडे असलेलं माहितीचं भांडार आणि विविध स्त्रोत यांच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती गोळा करण्यात आली आहे.