नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ केली आहे. प्रसारित केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळं रेपो दर ४ टक्क्यांवरुन ४ पूर्णांक ४ टक्के झाला आहे.

यासोबतच स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आणि बँक दरही ४ दशांश टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळं हे दर ४ पूर्णांक १५ शतांश टक्के, ४ पूर्णांक ६५ शतांश आणि ४ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाले आहे. तत्काळ प्रभावानं ही दरवाढ लागू होणार आहे. परिणामी विविध कर्ज आणि ठेवींवर सर्वसामान्यांना अधिक व्याज द्यावं लागण्याची शक्यता आहे.

जगासह देशातही महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पतधोरण आढावा समितीनं अचानकपणे परवा आणि आज बैठक घेण्याचा निर्णय घेतला. महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी व्याजदर वाढीचा हा निर्णय एकमतानं घेण्यात आला.

जगातल्या काही देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळं आणि निर्बंधांमुळं पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम देशातल्या महागाई दरावर होऊ शकतो, अशी शक्यताही दास यांनी व्यक्त केली आहे.