चाकण येथील फिलिप्स इंडिया कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय
पुणे : चाकण येथील फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय असून कंपनीने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
चाकण येथील फिलिप्स इंडिया कंपनीची पाहणी आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मॅझॉन, चिप बिझिनेस लीडर बर्ट व्हॅन म्युर्स, बिझनेस लीडर आयजीटी सिस्टम्सचे अर्जेन रॅडर, आरोग्य सेवा नवोपक्रम केंद्राचे प्रमुख पियुष कौशिक, वित्त नियंत्रक हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटरचे चेतन लोणकर, अतिरिक्त संचालक संजय कोरबू, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम प्लांट मॅनेजर सचिन हुजरे, एमआयडीसीचे विपणन व्यवस्थपक अभिजित घोरपडे उपस्थित होते.
यावेळी श्री.देसाई म्हणाले, फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या हेल्थ केअर इनोव्हेशन सेंटरचे काम उल्लेखनीय असून कंपनीने कोरोना कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम खरोखरच नाविन्यपूर्ण असून कंपनीचे चांगले सहकार्य आहे.
उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्रात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील. कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना नोकरीच्या संधी मिळायला हव्यात. फिलिप्स कंपनीने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी श्री. देसाई यांनी कंपनीचे प्रकल्प, विविध उपकरण कक्ष, प्रयोगशाळा याची पाहणी करून माहिती जाणून घेतली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मॅझॉन आणि हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक कक्षाचे कार्य, नवे संशोधन इत्यादीची माहिती दिली.
विपणन व्यवस्थपक अभिजित घोरपडे यांनी महाराष्ट्रातील उद्योग संबंधित धोरणांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या संकल्पनेतून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, महाराष्ट्रात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण विकासकामांच्या माहितीचा समावेश होता.