पिंपरी : शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, त्यांना संगणकीय प्रणालीद्वारे “ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र” आणि “वैश्विक ओळखपत्र” (UDID) देण्यासाठी महापालिकेच्या वतीने १० मे ते ३१ मे या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे दिव्यांग नागरिकांकरीता ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

राज्य शासनाकडील दिव्यांग आयुक्तालय पुणे यांच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींचे राहणीमान उंचविण्याचे दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असलेल्या दिव्यांग व्यक्तींची  माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली असून त्याद्वारे त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या लिंकची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in (सर्वसाधारण माहिती सारथी दिव्यांग किरण) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींनी सर्वेक्षण फॉर्म भरणे बंधनकारक असून “दिव्यांग प्रमाणपत्र” आणि “युडीआयडी कार्ड” करीता www.swavlambancard.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपले दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड प्राप्त करून घ्यावे, अशी माहिती नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली.

याकामाकरीता दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करणा-या संस्थांनी पुढाकार घेवून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने सहाय्य करावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे. तसेच याबाबत महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांनी त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आयुक्त पाटील यांनी केले आहे.