नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ लसीकरणाच्या मंद गतीबद्दल केंद्रसरकारनं चिंता व्यक्त केली असून संपूर्ण लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांबरोबर कोविड लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेतला. कोविड-१९ लसीकरणाला गती देण्यासाठी व्यापक अभियान राबवण्याची गरज आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी येत्या जून आणि जुलै महिन्यात ‘हर घर दस्तक’ मासिक अभियान २ राबवण्याची तयारी करावी असे निर्देश त्यांनी दिले. घरोघरी जनजागृती करून लसीची पहिली, दुसरी आणि वर्धक मात्रा घेण्यासाठी पात्र नागरिकांचं प्रबोधन करणं, वृद्धाश्रम, शाळा, महाविद्यालयं आणि कारागृह या ठिकाणी लसीकरणावर विशेष जोर देणं हा या अभियानाचा उद्देश आहे.