नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या काळात जम्मू-श्रीनगर महामार्गावर आणि यात्रा मार्गात प्रतिकूल हवामानामुळे निर्माण होणारा संभाव्य अडथळा लक्षात घेता अंदाजे १५ हजार यात्रेकरूंच्या निवासाची सोय जिल्हा प्रशासनानं केली आहे.

यात्रेकरूंच्या निवासासाठी प्रशासनानं ३२ केंद्र निश्चित केली असून यात्रा सुरु होण्यापूर्वी या ठिकाणची सर्व व्यवस्था पूर्ण होईल असं जम्मू च्या उपायुक्त अवनी लवासा यांनी आकाशवाणीला सांगितलं. यंदाची ४३ दिवसांची अमरनाथ यात्रा येत्या ३० जून रोजी सुरु होणार असून ती ११ ऑगस्टपर्यंत चालेल. जम्मू बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि भगवती नगर निवारा केंद्रात यात्रेकरूंसाठी रेडियो फ्रीक्वेंसी ओळख टॅग उपलब्ध केले जातील.

या ठिकाणी हेल्प डेस्क स्थापन केले जातील. यात्रेकरूंसाठी १८ ठिकाणी लंगर चालवले जातील. तसंच यात्रा सुरु होण्यापूर्वी सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.