नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह जगभरात अत्यंत उत्साहात साजरा झाला. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्यानं देशभरातल्या सर्व ठिकाणांसह निवडक ७५ प्रसिद्ध स्थळावर विशेष स्वरुपात साजरा केला जात आहे.
योग केवळ आयुष्याचा एक भाग राहिला नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग बनला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी म्हैसूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. योग वैयक्तिक पातळीवर, समाजाला, देशाला इतकंच नव्हे तर संपूर्ण जगाला आणि संपूर्ण मानवतेलाच निरोगी जीवन जगण्याचा विश्वास देत आहे; त्यामुळेच यंदाच्या योग दिनाची संकल्पना ही मानवतेसाठी योग ही आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी १५ हजारांपेक्षा जास्त योग साधकांच्या बरोबरीनं योगाभ्यास केला.
नागरिकांनी योगाला दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी केलं. सिंकंदराबाद इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी केवळ शांतताच विकासाच्या मार्गावर नेऊ शकते आणि योग त्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याचं सांगितलं.