मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कॉंग्रेसच्या वतीनंही विविध ठिकाणी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनं करण्यात आली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात आज लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने काँग्रेस भवन लातूर इथं  जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या उपस्थितीत निर्दशनं करत आंदोलन करण्यात आलं. नंदूरबार मध्येही नेहरु चौकात आमदार शिरीष नाईकांच्या नेतृत्वात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी केली. ही योजना रद्द करुन युवकांना नियमीत पद्धतीने सैन्य भरती देवुन युवकांना रोजगार देण्याच्या मागणीही यावेळी करण्यात आली.

धुळ्यातही सैन्य दलात भरतीसाठी जाहीर केलेली ’अग्निपथ’ योजना हा तुघलकी निर्णय असल्याचे म्हणत कॉंग्रेसन त्याला विरोध केला आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यात विधानसभा मतदारसंघ निहाय या योजनेला विरोध दर्शविण्यासाठी कॉंगे्रस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. तहसिल कार्यालयाबरोबरच साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा इथंही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.