नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातील पुरी इथली जगप्रसिद्ध रथयात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत. भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची ही रथयात्रा दोन वर्षांनंतर होत असल्यामुळे यंदा भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. गेली दोन वर्षं कोरोना संकटामुळे भाविकांना या यात्रेसाठी पुरीमध्ये येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. यंदा मात्र जगन्नाथ यात्रेसाठी १० लाखांच्या आसपास भाविक पुरीमध्ये येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथंही भगवान जगन्नाथ यात्रेला आज उत्साहात प्रारंभ होत आहे.