मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. जनतेच्या हिताच्या कामात आमचा सातत्यानं पाठिंबा राहील. मात्र जनहिताकडे दुर्लक्ष झालं तर सरकारच्या लक्षात आणून द्यायला मागेपुढे पाहणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक प्रस्ताव यायला नको होता, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल नव्या सरकारचं अभिनंदन केलं. सत्तेच्या खेळात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं येत्या काळात पीक पाण्याच्या स्थितीकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी नव्या सरकारला केलं. शिवसेनेकडून भास्कर जाधव यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल एकनाथ शिंदे सरकारचं अभिनंदन केलं.