मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपुरच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात यावी, वारीमार्गावरील खड्डे भरून काढावेत, आणि अपघात टाळावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. त्यामुळे यावर्षी पंढरपुरात गर्दी वाढेल. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता ठेवावी, यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी तसंच काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवावी आणि ते वेळोवेळी रिकामे होतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ते म्हणाले की, शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणं, सामुग्री उपलब्ध करून द्यावीत. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी. रस्त्यांच्या स्वच्छतेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घेण्यात यावा, दैनंदिन साफसफाईसाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घेण्यात यावा. मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसंच पंपाचा वापर करून तुंबलेले पाणी काढण्यात यावे, आरोग्य सुविधा, औषधं, फवारणी चौख ठेवावी, ताप आणि साथीच्या आजारांवरील औषधांचा साठा पुरेसा असल्याची खातरजमा करुन घेण्यात यावी, असंही ते म्हणाले.