मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणाच्या ३१ दरवाज्यांपैकी १९ दरवाजे बंद करण्यात आले आहेत, तर १२ दरवाजे १ मीटरनं उघडण्यात आले आहेत. धरणामधून १४ हजार ८३२ क्युसेक पाणी तापी नदी पत्रात सोडलं जात आहे. हतनूर धरणाचा पाणी साठा सध्या धोक्याच्या पातळी खाली आहे. तरी धरण क्षेत्रातल्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु असून नदी-नाले तुडुंब भरले आहेत. जिल्ह्याच्या सर्व भागांत पेरणीची कामं पूर्ण झाली असून हा पाऊस शेतीसाठी उपयोगी असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे. जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती नसली तरी जनजीवन सुरळीत राहावं याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे. जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातल्या हेमलकसा जवळच्या कुमरगुडा नाल्याचा रपटा वाहून गेल्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला आहे.
पालघर जिल्ह्यात आजही पावसाची रिपरिप सुरूच आहे. धुळे जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. शहराच्या सखल भागात पाणी भरलं आहे, तर ग्रामीण भागात शेतकरी सुखावला आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज दमदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणात २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली असून जिल्ह्यातले पाणी प्रकल्प, भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातल्या खामगाव, सेवा संग्रामपूर, जळगाव, जामोद, देऊळगावराजा, मोताळा, बुलडाणा यासह अनेक ठिकाणी काल दुपारपासून जोरदार पाऊस सुरु झाला. तालुक्यातल्या अनेक नद्यांना पूर आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गेले दोन दिवस जिल्ह्याच्या आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षीक सरासरीच्या २४ टक्के इतकं पर्जन्यमान नोंदवलं गेलं. या पावसामुळे खरीप हंगामातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत आज जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना गती मिळणार आहे.