पुणे : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक निरीक्षकांना जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची तर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त, चेकपोस्ट आदी नियोजनाची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

याप्रसंगी हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबापेठ निरीक्षक संतोषकुमार यादव, पोलीस ऑब्झर्व्हर आयुष मणी तिवारी, जुन्नर व आंबेगाव निरीक्षक चंदर शेखर, खेड-आळंदी व शिरूर निरीक्षक मिथिलेश कुमार, दौंड व इंदापूर निरीक्षक देवदत्त शर्मा, बारामती व पुरंदर निरीक्षक दीपक सिंह, भोर व मावळ निरीक्षक महंमद शफकत कमल, चिंचवड व पिंपरी निरीक्षक राजीव रत्तन, भोसरी व वडगावशेरी निरीक्षक गगनदीप सिंग ब्रार, शिवाजीनगर व कोथरूड निरीक्षक समीर वर्मा, खडकवासला व पर्वती निरीक्षक साजिदा इस्लाम रशीद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सांवत उपस्थित होते.

याप्रसंगी निवडणूक निरीक्षक यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मतदान प्रक्रियेत कुठलीही अडचण उद्भवू नये याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रांवर नेटवर्क उपलब्ध नाही, तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्या.