अमरावती विभागातील निवडणूक तयारीचा आढावा
अमरावती : निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी येथे दिले.
निवडणूक आयोगाच्या पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आयोगातर्फे राज्याचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलींद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.कुमार म्हणाले की, मतदान केंद्राध्यक्षांसह प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. किरकोळही चूक घडता कामा नये. अन्यथा, निवडणूक याचिका दाखल होण्याचे प्रसंग उद्भवतात. चूक आढळल्यास चौकशी प्रक्रिया, दंडाची तरतूदही आहे. याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना असली पाहिजे. त्यासाठी अधिक सुस्पष्ट, अचूक व पारदर्शक काम करावे.
आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरुन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवावे. मतदारांना मतदान पावती घरपोच मिळेल यासाठी अगोदरच नियोजन करुन त्या पोहोचत्या कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्तरावर भरावयाचे विवरणपत्रे, मॉकपाेल, मतदानाची वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही आदी संदर्भात पूर्णपणे माहिती द्यावी. आयोगाला सादर करावयाची माहिती अचूक असावी. सर्व शासकीय यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व सोयीसुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात, अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा, असेही श्री. कुमार यांनी यावेळी सांगितले.
मतदान, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, केलेल्या व करावयाच्या उपाययोजना आदींबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून श्री.कुमार यांनी आढावा घेतला.
कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी श्री.भारंबे म्हणाले की, मतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज रहावे. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांकडून तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे. मतदारांना प्रलोभन किंवा रोख रक्कम वितरण आदी प्रकारांना आळा घालावा. प्रत्येक चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची कटाक्षाने दक्षता घेऊन कारवाई करावी.