पिंपरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

पंकजा मुंडे यांच्या सभेदरम्यान काही नागरिक आणि महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अनधिकृत बांधकाम कर प्रश्न का सोडवला नाही, याविषयी संतप्त आंदोलकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घोषणाबाजी करणारे तिघे हे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेंची पिंपरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

हक्कांचे घर हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी आले नाही, मात्र मत मागण्यांसाठी चिंचवडमध्ये आले, असे प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. खरंतर पिंपरी चिंचवड शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गावर अनेकांची घरं ही बेकायदेशीर आहे. आता त्या घरांवर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण हातोडा चालवणार आहे. आमची घरं नियमित करण्यात यावी अशी मागणी या बाधित लोकांनी भाजपकडे केली. यासाठी त्यांच्याकडून विविध आंदोलने करण्यात आली. यानंतर भाजपने योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. याच कारणाने कृती समितीच्या सदस्यांनी आज पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घातला.