पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही फेरफार अदालत नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरली.
प्रमाणीकरणासाठी उपलब्ध ४ हजार २० नोंदीची निर्गती, १३७ प्रलंबित तक्रार प्रकरणे, ७१० डी.एस.डी कलेले सातबारा, ३३८ दुरुस्त केलेल्या त्रुटी असे एकूण ५ हजार २५ एवढे नोंदीबाबतचे कामकाज करण्यात आले. यासोबतच नागरिकांच्या इतर ४ हजार ४८४ अर्जाचे निराकरण झाले.
या फेरफार अदालतीमध्ये सं.गा.यो. लाभार्थी चौकशी अर्ज, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, चौकशी अर्ज, शिधापत्रिकेबाबत गृह चौकशी अहवाल, तहसिल कार्यालयाकडून प्राप्त विविध प्रकारचे चौकशी अहवाल, ७/१२ तील प्रलंबित प्रकरणांचे कामकाज असे एकूण ९ हजार ६८९ दर्जाबाबत कामकाज पुर्ण करण्यात आले.
महसुली कामकाजात गतिमानता
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फेरफार अदालतीद्वारे नागरिकांच्या ७/१२ विषयक समस्या सोडवण्यावर विशेष भर दिला आहे. यापूर्वी कोरोना कालावधी वगळता दहा फेरफार अदालती पार पडल्या असून त्यामध्ये एकूण ३४ हजार ६५५ नोंदी निर्गत करण्यात आल्या. सप्टेंबर २०२० पुर्वी पुणे जिल्ह्याच्या एकूण भरलेल्या नोंदी ६ लक्ष ७४ हजार होत्या. मागील दोन वर्षांत यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन आज रोजी भरलेल्या नोंदी १२ लक्ष ३७ हजार झाल्या आहेत. मागील दोन वर्षात विक्रमी ५ लक्ष ९७ हजार नोंदी घेण्यात आल्या आहे. एकूण नोंदीमध्ये पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नोंदी निर्गतीमध्येदेखील पुणे जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली असून मागील दोन वर्षांत ५ लक्ष ८६ हजार इतक्या नोंदी निर्गत केल्या आहेत. पूर्वी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध सरासरी ३० हजार नोंदी प्रलंबित होत्या. तथापी मागील एका वर्षांत या प्रलंबित नोंदी कमी होऊन १२ हजार झाल्या आहेत पुणे जिल्ह्यात तक्रार प्रकरणातदेखील घट झाली असून मागील वर्षी ४ हजार ४०० तक्रार प्रकरणे प्रलंबित होते, तर आज ३ हजार ५४ प्रलंबित आहे. ७/१२ टी विरहित करण्याचे कामकाज अंतिम टप्यात असून ७/१२ डीएसडी करण्याचे कामकाज ९९.५५ टक्के पूर्ण झाले आहे व विसंगत सके क्रमांक त्रुटी निर्गत करणेचे कामकाज ९९.५० टक्के पूर्ण झाले आहे.
मागील वर्षी खरीप २०२१ मध्ये ई-पीक पाहणीमध्ये पुणे जिल्ह्यात योजनेच्या पहिले वर्ष असूनही शेतकऱ्यांनी विक्रमी पिक पाहणी केली असून ७ लक्ष ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनमध्ये सहभाग नोंदवून २८४ प्रकारच्या पिकांची नोंद केली. ई-पीक पाहणीमध्ये पुणे जिल्हा हा राज्यात दुसन्या क्रमांकावर आहे.
सातबारा, ८अ ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करुन घेण्यातदेखील पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तलाठी यांचेकडून नागरिकांना ७९ लाख २९ हजार ७७१ एवढे ७/१२ व ८ अ उतारे वितरीत केले आहे. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने २५ लक्ष डिजीटल ७/१२ डाउनलोड करण्यात आले असून यामध्ये ४ कोटी १४ लक्ष रुपये शासनास प्राप्त झाले आहेत.
या फेरफार अदालतीचे स्वरुप आणखी व्यापक करण्यात आले असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून इतर अनेक शासकीय योजनांच्या लाभांची प्रकरण फेरफार अदालतीमध्ये निर्गत करणे १० ऑगस्टच्या फेरफार अदालतीपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार या फेरफार अदालतीमध्ये कामकाज करण्यात आले असून यासोबत मोठ्या प्रमाणात कामकाजाची निर्गती करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.