पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार यादव, चंदर शेखर, मिथिलेश कुमार, देवदत्त शर्मा, दीपक सिंह, महंमद शफकत कमाल, राजीव रत्तन, गगनदीप सिंग ब्रार, समीर वर्मा, साजिदा इस्लाम रशीद आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण, मॉकपोल पध्दती, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर अधिकारी यांच्यातील समन्वय, मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य आदि बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

मतमोजणी केंद्राची मांडणी व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य, संनियंत्रण पदधती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना अशा अनेक विषयांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लापशेटवार यांनी केले.

या प्रशिक्षणास निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.